Ad will apear here
Next
व्यंकटेश माडगूळकर, रेखा बैजल आणि वि. म. दांडेकर
व्यंकटेश माडगूळकर, रेखा बैजल आणि वि. म. दांडेकर या मराठी साहित्यिकांचा सहा जुलै हा जन्मदिन. त्या निमित्ताने, दिनमणी सदरात त्यांचा अल्प परिचय...

व्यंकटेश माडगूळकर
सहा जुलै १९२७ रोजी सांगलीमधल्या माडगूळ गावी जन्मलेले व्यंकटेश माडगूळकर हे एक सिद्धहस्त लेखक आणि उत्तम चित्रकार. ‘गदिमां’सारख्या थोर वडील भावाचे तितकेच थोर लेखक बंधू. सात कादंबऱ्या, दोनशे कथा, पस्तीसहून अधिक चित्रपटसंहिता याशिवाय प्रवासवर्णने, नाटके असे थक्क करणारे लेखन त्यांनी केले आहे.

करुणाष्टक’, ‘कोवळे दिवस’, ‘अशी माणसं अशी साहसं’, ‘बाजार’, ‘बेलवण’ , ‘छोटा जवान’, ‘चित्रकथी’, ‘चित्रे आणि चरित्रे’, ‘डोहातील सावल्या’, ‘एक एकर’, ‘गावाकडच्या गोष्टी’, ‘जांभळाचे दिवस’ अशी त्यांची अनेक पुस्तके गाजली. प्रामुख्याने ग्रामीण जीवनावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. ‘माणदेशी माणसे’ आणि ‘बनगरवाडी’ ही त्यांची अत्यंत लोकप्रिय पुस्तके. ते स्वतः जंगलात रमणारे असल्याने तिथले वन्यजीवन टिपून त्यांनी त्यावर अतिशय सुरेख, तपशीलवार लेखन केले आणि त्या पुस्तकांसाठी अत्यंत समर्पक अशी चित्रे, रेखाटनेही काढली.

माकडांच्या टोळ्यांवर त्यांचं ‘सत्तांतर’ हे पुस्तक प्रचंड गाजले आणि त्याला १९८३ सालचा साहित्य अकादमी पुरस्कारही मिळाला. त्याच साली अंबाजोगाई इथे भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले. त्यांच्या अनेक कथांवर मराठीत चित्रपटही बनले आणि त्यासाठी त्यांनी पटकथाही लिहील्या.

जोसेफ स्टाइनच्या मूळ नाटकावर आधारित टोपोल या नटाचा ‘फिडलर ऑन द रूफ’ सिनेमा प्रचंड गाजला. त्याच कथेवर मराठीत नाटक आणावे ह्या विजया मेहता यांच्या आग्रहावरून माडगूळकरांनी ‘बिकट वाट वहिवाट’ हे नाटक लिहिले. श्रीकांत मोघे यांची त्या नाटकातली भूमिका गाजली होती.

२८ ऑगस्ट २००१ रोजी माडगूळकरांचा मृत्यू झाला.

रेखा बैजल
सहा जुलै १९५२ हा रेखा बैजल यांचा जन्मदिन. मूळच्या जालन्याच्या असलेल्या रेखा सप्रे-बैजल यांनी मराठीमध्ये ललित लेख, कथा, कादंबरी, कविता असे विविधांगी विपुल लेखन केले आहे. बैजल यांचा ‘अब तो जिया जाये’ हा हिंदी कवितासंग्रहही लक्षवेधी ठरला. 

त्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांना नरहर कुरुंदकर पुरस्कार, बा. सी. मर्ढेकर पुरस्कार, नाथ माधव पुरस्कार, कै. दि. बा. मोकाशी पुरस्कार, अनंत काणेकर  पुरस्कार असे विविध पुरस्कार मिळाले आहेत.

आदिम’, ‘तपस्या’, ‘मानस’, ‘स्पंदन’, ‘पक्षी जाय दिगंतरा’ सारखे अकरा कथासंग्रह, ‘अग्निपुष्प’, ‘जलपर्व’, ‘तृप्ता’सारख्या सहा कादंबऱ्या आणि ‘आकाशओढ’, ‘भिंत काचेची’ यांसारखी नाटके अशी त्यांची अनेक पुस्तके गाजली आहेत.


वि. म. दांडेकर
सहा जुलै १९२० रोजी जन्मलेल्या विनायक महादेव दांडेकरांना भारतात होऊ घातलेल्या स्वातंत्र्यलढ्याचे सुप्त आकर्षण न वाटते तरच नवल. स्वतः गांधीवादी नसूनही त्यांनी आयुष्यभर खादी वापरणे पसंत केले हे विशेष!!

तरुण वयात कलकत्ता युनिव्हर्सिटीतून स्टॅटिस्टिक्स विषयामध्ये मास्टर्स पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी लंडन युनिव्हर्सिटीत स्टॅटिस्टिक्समध्येच पीएचडी करण्याचे ठरवले आणि ते लंडनला जाणाऱ्या आगबोटीत चढले. परंतु बोटीत असलेल्या भारतीय तरुणांना बोटीच्या वाहतूक कंपनीकडून सापत्न भावाने दुय्यम वागणूक मिळत असल्याचे पाहून, निषेध म्हणून ते जे बोटीवरून खालती उतरले, ते पुन्हा शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याच्या फंदात न पडण्यासाठीच!!

भारतातले एक ‘अग्रणी अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वि. म. दांडेकर यांनी पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेमध्ये संशोधक म्हणून बरीच वर्षे काम केले आणि त्या संस्थेचे ते संचालक ही होते. अनेक वर्षे त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध आर्थिक मंडळांवर अध्यक्ष या नात्याने काम केले. ‘महाराष्ट्राची ग्रामीण रचना’, ‘गावरहाटी’, ‘गाईचे अर्थशास्त्र’ इत्यादी पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. ३० जुलै १९९५ रोजी त्यांचे निधन झाले.









 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZTCBE
Similar Posts
लीलावती भागवत, कविता महाजन बालकुमार साहित्यात मोलाची भर टाकणाऱ्या लीलावती भागवत, सामाजिक विषमता आणि स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या कविता महाजन, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक भालचंद्र बहिरट, गोव्याविषयी विशेष संशोधन करणारे अनंत प्रियोळकर आणि ‘गावगाडा’कार त्रिंबक आत्रे या साहित्यिकांचा पाच सप्टेंबर हा जन्मदिवस. त्यानिमित्त आज ‘दिनमणी’मध्ये या सर्वांचा अल्पपरिचय
नरेंद्र बोडके ‘समुद्राचा दुपट्टा सतत सळसळता, आपण पाठवतो पावसाच्या लिपीतले संदेश, खरं तर आपण नसतोच- सगळी असण्याची चलबिचल, आपल्या पलीकडे, आपण निरभ्र, शांततेहून पारदर्शी, मौनाइतके बोलके,’ असं मांडणारे कवी आणि पत्रकार नरेंद्र बोडके यांचा २३ डिसेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
पु. शि. रेगे, जेम्स बॉल्डविन, इसाबेल अजेंडे आपल्या कवितांमधून अत्यंत धीट भाषेत स्त्रीच्या विविध रूपांचं सहजसुंदर वर्णन करणारे पु. शि. रेगे, अमेरिकेतल्या हार्लममधल्या आफ्रिकन लोकांच्या वाट्याला येणाऱ्या जीवनाविषयी तळमळीने लिहिणारे जेम्स बॉल्डविन आणि जगातली सर्वांत लोकप्रिय स्पॅनिश लेखिका इसाबेल अजेंडे यांचा दोन ऑगस्ट हा जन्मदिवस.
जॉर्ज बर्नार्ड शॉ, ऑल्डस हक्स्ली, डॉ. मिलिंद जोशी एकीकडे २९ पूर्ण लांबीची नाटकं आणि २२ छोट्या प्रवेशांची नाटकं अशी भरघोस साहित्यनिर्मिती करताना, ‘पिग्मॅलिअन’ ह्या नाटकामुळे अजरामर झालेला महान आयरिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि ‘ब्रेव्ह न्यू वर्ल्ड’ या भविष्याचा वेध घेणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण कादंबरीमुळे गाजलेला ऑल्डस हक्स्ली या इंग्लिश लेखकांचा आणि ‘अनंत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language